देशातील सर्वच नागरिकांना कोरोना लस मोफत मिळणार, ओडिशाच्या प्रचार सभेवेळी केंद्रीय मंत्री सारंगी यांचा दावा

बिहारींसाठी मोफत लसीचे वचन अंगलट आल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी रविवारी ओडिशाच्या प्रचार सभेवेळी सुधारित दावा केला. देशातील सर्वच नागरिकांना कोरोना लस मोफत मिळणार आहे.

प्रत्येक व्यक्तीसाठी साधारण 500 रुपये खर्च येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी ही घोषणा केली आहे, असे सारंगी यांनी सांगितले. मोदी सरकारवर देशभरातून जोरदार टीका होत असताना त्यांनी हा दावा केला.

‘निवडून द्या, मोफत लस देतो’ असे वचन भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यातून दिले. त्यावर केंद्र सरकार केवळ निवडणूक असलेल्याच राज्यांत लस देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणीही करण्यात आली.

विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच घेरले. याचदरम्यान ओडिशातील जनतेला मोफत लस देण्याबाबत भाजपची भूमिका काय, असा सवाल तेथील अन्न पुरवठा मंत्र्याने केला. त्यावर सारंगी यांनी बालासोर प्रचारसभेचे निमित्त साधून स्पष्टीकरण दिले.

सर्वच देशवासीयांना कोरोनाची लस मोफत देण्याची केंद्राची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. बालासोरमध्ये येत्या 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे पुन्हा निवडणुकीचाच मुहूर्त व ठिकाण निवडून भाजपने लसीबाबत सुधारित दावा केल्याची चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या