युनायटेड अरब नोटांच्या आमिषाने दिली साबणाची वडी, तरूणाला दोन लाखांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी चलनातील नोटा घेऊन त्या बदल्यात युनायटेड अरब इमिरेटसच्या नोटा देण्याच्या बहाण्याने तरूणाला साबणाची वडी देऊन दोन लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

ही घटना 16 सप्टेंबरला रात्री साडेसातच्या सुमारास कोंढवा रस्त्यावरील साईनगर गल्ली क्रमांक तीन मध्ये घडली. याप्रकरणी 28 वर्षीय तरूणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी तरूणाला हिंदुस्थानी चलनातील नोटा बदलून युएई देशाचे दिरहम चलन मिळवायचे आहे. त्यानुसार मित्राच्या मध्यस्थीने तरूणाने एकासोबत बोलणे केले. त्यानुसार संबंधिताने हिंदुस्थानी चलनातील कमी पैशात युएई देशाचे चलन देण्यासाठी आमिष दाखविले.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी तरूणाला कोंढवा रस्त्यावर बोलावून घेत, त्याच्याकडे कागदात गुंडाळलेले बंडल दिले. त्यामध्ये दिरहम चलन असल्याचे भासवून आरोपींनी तरूणाकडून 2 लाख 1 हजार रूपये घेत निघून गेले.

त्यानंतर तरूणाने पिशवी उघडून पाहिले असता, कागदात गुंडाळलेला साबण त्याला आढळला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करीत आहेत.