महाराष्ट्रातील प्लॅस्टिकबंदीवर संयुक्त राष्ट्रसंघाकडून शिक्कामोर्तब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्यातील प्लॅस्टिकबंदीचे सर्वांकडून स्वागत होत आहे. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि पुढील पिढीसाठी घेतलेला हा निर्णय आहे. युनायडेट किंग्डम व इतर काही देश हा निर्णय घेत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने (युनायटेड नेशन्स) आपल्या प्लॅस्टिकबंदीवरही शिक्कामोर्तब केले आहे, अशी माहिती शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दिली.

राज्यातील प्लॅस्टिकबंदीचा आढावा घेण्यासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला आदित्य ठाकरे तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, पर्यावरण खात्याचे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, प्लॅस्टिकबंदीचे सर्वांकडून स्वागत होत आहे. मी सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो. कारण प्लॅस्टिकबंदी हा मोठा विषय आहे. हा केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण जगाच्या हिताचा निर्णय आहे. युनायटेड किंग्डम तसेच केनिया व इतर काही देश असा निर्णय घेत आहेत. ऑगस्टमध्ये आपण हा निर्णय घेतला. युनायटेड नेशन्सनी या बंदीवरही शिक्कामोर्तब केले आहे. प्लॅस्टिकबंदीनंतर आता लोकांमध्ये चांगल्या सवयी येत आहेत. लोकांच्या हातात आता कापडी पिशव्या, ज्युटच्या बॅगा दिसत आहेत.

आढावा बैठकीतील निर्णयाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आढावा बैठकीत चांगली चर्चा झाली. कोणत्या गोष्टींवर बंदी आणायची, पुढे काय करायचे, त्यात सुधारणा कशा करता येतील यावर चर्चा झाली. अर्थात ही बैठक चार अधिकाऱयांमध्ये झाली. त्यावर पुढील निर्णय पर्यावरणमंत्री रामदास कदम घेतील. प्लॅस्टिकबंदीवरून काही लोकांकडून टीका होत आहे याकडे त्यांचे लक्ष वेधले असता जनतेचे ऐकत राहायचे व चांगल्या गोष्टी करीत राहायचे. महाराष्ट्राचा विचार करून घेतलेला हा निर्णय आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही चांगले असेल तो निर्णय आम्ही नक्कीच घेऊ, असे आदित्य ठाकरे म्हणाले.