विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाचीही दुरवस्था; बास्केटबॉल, बॅडमिंटन कोर्टची वाताहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रापाठोपाठ मरीन लाइन्स येथील क्रीडा संकुलाचीही दुरवस्था झाली आहे. देखभालीअभावी बास्केटबॉल आणि बॅडमिंटन कोर्ट खराब झाले असून ही दोन्ही मैदाने डागडुजीच्या प्रतीक्षेत आहेत. कबड्डीचे मॅट सुस्थितीत आहे, पण ते कचर्‍यात पडून असल्याने काही दिवसांनी त्याचीही दुरवस्था होण्याच्या मार्गावर आहे. युवासेनेने क्रीडा संकुलाच्या झालेल्या या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला असून या हलगर्जीपणाबाबत प्रभारी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांना निवेदन दिले आहे.

युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि डॉ. धनराज कोहचाडे यांनी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाची पाहणी केली. खेळाच्या साहित्याबरोबरच पिण्याचे पाणी, वीज जोडणी, संकुलाचे प्रवेशद्वाराचीही दयनीय अवस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा कुलर कित्येक महिने बंद आहे. या ठिकाणी एकच कुलर असून तोही खराब झाल्याने विविध स्पर्धांसाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची तहानच भागत नाही. तसेच संकुलात केवळ दोनच हॅलोजन आहेत. मीटर बॉक्समध्ये पाण्याची गळती होत असल्याने शॉर्टसर्किट होण्याची भीतीही नाकारत येत नाही. तुटलेल्या प्रवेशद्वारामुळे संकुलाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे सिनेट सदस्यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले.

प्र-कुलगुरूंनी बोलावली तातडीची बैठक

युवासेनेने प्रभारी कुलसचिवांना क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेबाबत निवेदन दिल्यानंतर प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी गुरुवार, 26 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता क्रीडा संकुलाचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.

या आहेत युवासेनेच्या मागण्या

  • बॅडमिंटन, बास्केटबॉल कोर्टची डागडुजी करावी.
  • कचर्‍यात पडलेले कबड्डीचे मॅट चांगल्या ठिकाणी हलवावे.
  • क्रीडा संकुलासाठी नवीन प्रवेशद्वार बसवावे.
  • पिण्याच्या पाण्यासाठी कमीत कमी 2 कुलरची सोय करावी.
  • संकुलात नवीन कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करावी.
  • क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांना विनामूल्य सरावाची मुभा द्यावी.