
सामना प्रतिनिधी । नांदेड
गुरूवार 1 नोव्हेंबर रोजी रात्री 11.30 च्या सुमारास साठे चुकते उड्डाण पुलाजवळ तांडा हॉटेलचे मालक सुरेश राठोड यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्या पायाला गोळी लागली असून ते बालंबाल बचावले आहेत.
रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या ‘तांडा हॉटेल’चे मालक सुरेश राठोड हे नेहमीप्रमाणे आपल्या हनुमानगढ येथील घरातून रात्री 11.30 च्या सुमारास तांडा हॉटेलकडे निघाले. साठे चौकातील उड्डाण पुलाजवळ त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवरील दोघांनी पिस्तुलातून त्यांच्यावर गोळी झाडली. ती गोळी त्यांच्या पायावर लागली. सुरेश राठोड यांच्याकडेही परवानाधारक पिस्तूल आहे. त्यांनी आपल्या पिस्तुलातून हल्लेखोरांवर उलटवार केला. त्यामुळे हल्लेखोर पळून गेले.
सुरेश राठोड यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटना घडताच अपर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे,उप अधीक्षक अभिजित फस्के,पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा पोहचला. शहरातून जाणारे रस्ते आणि बाहेर जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते. पण हल्लेखोर काही सापडले नाहीत.































































