रत्नागिरीतील ‘तो’ पर्ससीन ट्रॉलर पळाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मालवण

किल्ले सिंधुदुर्ग नजीक समुद्रात शनिवारी सायंकाळी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेने पकडलेला रत्नागिरीतील पर्ससीन ट्रॉलर काळोखाचा फायदा उठवत पळून गेला. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान गस्ती नौकेवर असलेले मत्स्यव्यवसाय विभागाचे देवगड येथील परवाना अधिकारी प्रतीक महाडवाडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी एमसीयान अदनान (आयएनडी एमएच-४ एमएम ४२५० ) या पळालेल्या ट्रॉलरवरील तांडेल अलीअब्बास अहमद दड्डा वय-५२ रा. भटकळ जि. उत्तर कन्नडा राज्य-कर्नाटक सध्या रा. रत्नागिरी, मोहम्मदगोसे युसुफ दुम्मा वय- ४२ रा. नॅशनल कॉलनी मुरुडेश्‍वर भटकळ जि. उत्तर कन्नडा सध्या रा. रत्नागिरी या दोघांविरोधात पोलिसांनी शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील पर्ससीनधारकांनी घुसखोरी करत मासळीची लूट सुरू केली आहे. याप्रकरणी स्थानिक मच्छीमारांनी येथील मत्स्यव्यवसायच्या परवाना अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उपलब्ध न झाल्याने देवगड येथील परवाना अधिकार्‍यांना बोलवावे लागले. अखेर गस्तीनौकेच्या साहाय्याने किल्ल्यानजीकच्या समुद्रात एक पर्ससीनचा ट्रॉलर पकडण्यात या गस्तीनौकेला यश मिळाले. महाडवाला यांनी या ट्रॉलरवरील तांडेल व खलाशांकडे केलेल्या चौकशीत मासेमारीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्या ट्रॉलरवरील तांडेल अलीअब्बास दड्डा याला ताब्यात घेतले.

तसेच ट्रॉलरवरील सर्व खलाशांची ओळखपत्रे ताब्यात घेत त्यांना ट्रॉलर बंदरात आणण्याचे आदेश दिले. या ट्रॉलरवर अंदाजे पाचशे किलो बांगडा मासळी तसेच अन्य प्रकारची मासळी होती. अशी माहिती मत्स्यव्यवसायच्या अधिकार्‍यांनी दिली. मात्र बंदरात निघालेली गस्तीनौका पाहून काळोखाचा फायदा घेत त्या ट्रॉलरवरील दुसर्‍या तांडेलने ट्रॉलरसह पळ काढला. मत्स्यव्यवसाय विभागाच्या हलगर्जीपणामुळेच हा ट्रॉलर पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे.

अखेर मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकार्‍यांनी पोलिस ठाणे गाठत घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तांडेल अलीअब्बास दड्डा व मोहम्मदगोसो दुम्मा यांच्याविरोधात शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुनील वेंगुर्लेकर करत आहेत.

गस्तीनौकेने पकडलेल्या पर्ससीनच्या ट्रॉलरवर कोणताही परवाना न मिळाल्याने जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अनधिकृतरीत्या पर्ससीनची मासेमारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गस्ती नौका वेळेत पोहचली मात्र एकाच बोटींवर कारवाई 

मासेमारी हंगामात नव्याने करारबद्ध केलेली गस्ती नौका दोन महिने झाले तरी मत्स्य विभागाच्या ताफ्यात पोहचली नाही. त्यामुळे मागील वर्षी करारबद्ध नौका तात्पुरत्या स्वरूपात वापरली जात आहे. त्या गस्ती नौकेची वेग घुसखोरी करणाऱ्या परराज्यातील बोटींपेक्षा कमी असला तरी स्थानिक बोटी एवढाच आहे. मात्र नौका कारवाईसाठी पोहचली तरी एखाद्या बोटीवरच कारवाई होते. अन्य नौका पळून जातात. हे नित्याचेच बनले आहे.  

पळालेल्या ट्रॉलरवर कोणती कारवाई होणार

पकडलेल्या बोटींवर मासेमारी बाबत कोणतीही कागदपत्रे नव्हती. तर बोटींवर मासळीही सापडली होती. याचा विचार करता पकडलेली बोट पळाल्याने बोटींवर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.