उन्नाव बलात्कार प्रकरण – गुन्हेगाराला जामीन मिळणे लज्जास्पद आणि निराशाजनक; राहुल गांधी संतापले

उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. त्यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. एखाद्या गुन्हेगाराला जामीन मिळणे लज्जास्पद आणि निराशाजनक असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणावर एक्सच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत बलात्कार पीडितेचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एखाद्या बलात्कार पीडितेला सातत्याने त्रास दिला जात आहे. बलात्काऱ्यांना जामीन देणे कोणता न्याय आहे, सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेसोबत हे वागणं बरोबर आहे का? न्यायासाठी तिने आवाज उठवला ही तिची चूक आहे का? असा संताप राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

पुढे ते म्हणाले, आपण फक्त एक मृत अर्थव्यवस्थाच नाही तर अशा अमानवीय घटनांसोबत एक मृत समाज बनत चाललो आहोत. लोकशाहीत एखाद्या घटनेविरोधात आवाज उठविणे अधिकार आहे आणि तो दाबणे गुन्हा आहे. त्यामुळे पीडितेला सन्मान, सुरक्षा आणि न्याय मिळायलाच हवा, असे ते म्हणाले.