
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गेल्या चार दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आजही कोल्हापूर, नगर आणि सातारा जिह्यांच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाली आहेत. यासह द्राक्षबागा, स्ट्रॉबेरीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जावळी तालुक्यातील सोनगाव, सर्जापूर येथे ज्वारीसह अन्य पिकांना फटका बसला आहे. तर, राहुरी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला असून, उसाच्या शेतात कमरेइतके पाणी साचले आहे.
कोल्हापूर जिह्यात आज पुन्हा दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, तर सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे कोल्हापूरकरांची आजही चांगलीच दैना उडाल्याचे दिसून आले. गगनबावडा तालुक्यात जोरदार पावसाने शेतकऱयांची दैना उडविली असून, जनावरांचा चारा, खते, ऊस यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जनावरांचा सुका चारा रानातच भिजला गेल्याने शेतकऱयांना पावसाळी हंगामाची चिंता वाढली आहे. धुवाँधार पावसाने राहुरी तालुक्यातील शेरी, चिखलठाण, म्हैसगाव परिसरातील पिकांची धुळधाण झाली आहे. नोव्हेंबर 2019मध्ये या भागात झालेल्या ढगफुटीमुळे उभी पिके वाहून गेल्याची घटना घडली होती. या धक्क्यातून शेतकरी सावरलेला नसतानाच निसर्गाने या भागाला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा दिला आहे. गुरुवारी सायंकाळी आगमन झालेला धुवाँधार पाऊस शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू राहिल्याने या भागात कांदा, ऊस, तसेच भाजीपाला व चारा पिकांत पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात साचून राहिले आहे. ऊसतोड लांबणीवर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
महाबळेश्वरात पर्यटकांची तारांबळ
महाबळेश्वर शहर व परिसराला आज मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या मुसळधार पावसाने पर्यटनास आलेले पर्यटक व स्थानिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन वाजल्यानांतर पावसास सुरुवात झाली. सुमारे दोन तास धुवाँधार पाऊस बरसत होता. मुसळधार पावसामुळे वाई तालुक्यातील ज्वारीच्या पिकांसह मोहर आलेल्या आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, ज्वारीसह भाजीपाला, फळभाज्या, स्ट्रॉबेरी पिकांचेही नुकसान झाले आहे. जावळी तालुक्यात सोनगाव, सर्जापूर, कुडाळ या विभागातील ज्वारीसह अन्य पिके भुईसपाट झाली.




























































