
अवेळी पाऊस आंबा पिकाला घातक असल्याने आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. नगदी पिक मानला जाणारा हापूस दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरत असल्याने बागायतदारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. हापुसला पोषक असणारी थंडी गायब असतानाच अवेळी पावसाने हजेरी लावल्याने यावर्षीही हापुसचे अर्थकारण पुर्णपणे गडगडण्याची भिती व्यक्त होत आहे.
अवीट गोडी असलेल्या कोकणच्या हापुसची जगभरात वेगळी ओळख आहे. देश-परदेशात हापुसला मोठी मागणी असल्याने हापुस व्यवसायात मोठे अर्थकारण दडलेले आहे. मात्र गेली काही वर्षे या अर्थकारणाला निसर्गाची दृष्ट लागली आहे. अवेळी कोसळणारा पाऊस हापुस पिकाला हानीकारक असल्याने हापूसचे मोठया प्रमाणात नुकसान होवू लागले आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होणारी थंडी ही हापुस पिकासाठी अतिशय पोषक असते. या दोन महिन्यात चांगली थंडी असेल तर हापुस पिक चांगले येते मात्र गेले काही वर्षे कोकणातून थंडीच गायब झाली आहे. हे कमी की काय म्हणून अवेळी पाऊसही पडू लागला असल्याने हापूसची पुरती वाट लागली आहे.
हापूस निसर्गाच्या दृष्टचक्रात
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने थंडीही चांगली पडेल आणि हापुसला पोषक वातावरण तयार होईल अशी अपेक्षा आंबा बागायतदारांना होती. मात्र नोव्हेंबर संपून डिसेंबर महिन्याचे 15 दिवस उलटले तरी थंडीचा पत्ता नसल्याने हापुससाठी पोषक वातावरण अद्याप तयारच झालेले नाही. त्यातच आता रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली असल्याने हापुस पिकाबाबतच्या सा्रया आशा धुळीला मिळाल्या आहेत. हापूस या नगदी पिकावर कोकणचे फार मोठे अर्थकारण अबलंबून आहे. पिक चांगले आले तर चार महिन्यात करोडो रुपयांची उलाढाल होते. मात्र यंदा थंडी गायब असतानाच अवेळी पावसाने हजेरी लावल्याने नगदी पिक मानला जाणारा हापूस निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकला आहे.





























































