Operation Sindoor Debate : दहशतवादी पकडले जात नाहीत तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर यशस्वी म्हणता येणार नाही – सुप्रिया सुळे

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, जोपर्यंत सर्व दहशतवादी पकडले जात नाही, तोपर्यंत हे ऑपरेशन यशस्वी म्हणता येणार नाही. त्यांनी दहशतवादाविरोधातील कारवाईत पारदर्शकतेची मागणी करताना शहीदांच्या कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, असे आवाहन केले.

सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या काँग्रेसने गेल्या अनेक वर्षांत काहीच केले नाही, या विधानावर आक्षेप घेतला आणि म्हणाल्या की, “असे लोक चुकीची विधाने करतात आणि ती रेकॉर्डवरही चुकीची नोंदली जातात. हे ऐकून दुख होते. ही तू-तू-मैं-मैं ची वेळ नाही.” त्या म्हणाल्या की, “मी स्वतः डेलेगेशनसोबत गेले होते. जगाने हिंदुस्थानच्या तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.”

सुळे यांनी पहलगाम, उरी आणि इतर दहशतवादी हल्ल्यांमधील शहीदांना श्रद्धांजली वाहताना संतोष जगदाळे आणि अशोक गंगोटे यांचा विशेष उल्लेख केला. “जेव्हा मी त्यांच्या कुटुंबांना भेटते, तेव्हा त्यांच्या मुलीने विचारले, माझ्या वडिलांना न्याय कधी मिळणार?’ कश्मीर त्यांच्यासाठी स्वर्ग आहे, पण त्यांच्या कुटुंबांसाठी तो नरक बनला आहे,” असं त्या म्हणाल्या. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “दहशतवादी कधी आले, कसे गेले? याची उत्तरे सरकारकडे नाहीत.”