सिंधुदुर्ग किल्ल्यावर विशेष टपाल तिकीट

सिंधुदुर्ग किल्ला या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण हा केवळ आपल्या उज्ज्वल इतिहासाचा उत्सवच नाही, तर आपला ऐतिहासिक वारसा पुढील पिढीला कळावा यासाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्त्व आणि आपल्या उज्ज्वल इतिहासाचा वारसा जपण्याचा हा पोस्ट खात्याचा एक प्रयत्न आहे, असे भावोद्गार चीफ पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल किशन कुमार शर्मा यांनी मालवण प्रधान डाक घर येथे झालेल्या भारतीय डाक विभागाच्या ‘सिंधुदुर्ग किल्ला’ या विशेष टपाल पाकिटाच्या अनावरणप्रसंगी व्यक्त केले.

दरवर्षी डाक विभागामार्फत देशातील विशेष महत्त्व असलेल्या ऐतिहासिक वास्तू, संस्था, निवडक उत्पादने, सांस्कृतिक वारसा यांचे विशेष टपाल पाकिटाच्या रूपाने प्रकाशित करून सन्मानित करण्यात येते. या अनुषंगाने सिंधुदुर्ग डाक विभागाने सिंधुदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याबाबत विशेष टपाल पाकीट प्रकाशित करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी घेण्यात आला होता. सदर प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यात आला. रविवार 9 जून रोजी मालवण प्रधान डाक घर येथे चीफ पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल किशन कुमार शर्मा यांच्या हस्ते ‘सिंधुदुर्ग किल्ला’ या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण झाले. या वेळी पोस्ट मास्तर जनरल, गोवा रिजन आर. के. जायभाये, पोस्ट मास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल अमिताभ सिंग, डाक निदेशक  अभिजित बनसोडे, डाक निदेशक, गोवा रिजन रमेश पाटील यांसह बहुसंख्य टपाल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रांगोळी ठरली लक्षवेधी

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालवण येथील प्रतिभासंपन्न युवा कलावंत पार्थ मेस्त्राr यांनी छत्रपती शिवाजी महाराज, किल्ले सिंधुदुर्ग  आणि सिंधुदुर्ग डाक विभाग या आशयाची काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली.

विशेष टपाल पाकिटाद्वारे या प्रतिष्ठत वास्तूचा इतिहास व महत्त्व जगासमोर आणण्याच्या प्रवासात पोस्ट खात्याचेही योगदान देण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग डाक विभागाने यासाठी घेतलेला पुढाकार आणि परिश्रम हे आम्हाला आज या महत्त्वपूर्ण प्रसंगी घेऊन आले आहेत, असे मान्यवर म्हणाले.