
माझगाव येथील शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळय़ाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले, मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या महाराणा प्रताप यांच्या पुतळा उभारणीच्या कामाचे कौतुक केले. वारसा जतनाचे हे काम महत्त्वपूर्ण असल्याचेही ते म्हणाले. शिवसेना उपनेते-स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रयत्नातून शिरोमणी महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे.
आपण पुतळा बांधून थांबू नये, तर या महान शूरवीरांचा तेजाचा वारसा पुढे नेऊ या. त्या काळात या शूरवीरांसोबत जसे मावळे सोबत राहिले, त्याचप्रमाणे आपण सर्व असंख्य शिवसैनिक, मावळे माझ्यासोबत आहात हे माझे भाग्य आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कोनशिलेचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण
माझगाव येथील शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळय़ाच्या परिसरातील बेटावर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाचे तैलचित्र लावण्यात आले आहे तसेच येथे असलेल्या कोनशिलेचे व संविधान उद्देशिकेचे अनावरण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, आमदार यामिनी जाधव, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, नगरसेविका सोनम जामसुतकर, माजी नगरसेवक मनोज जामसुतकर, ई वॉर्डचे सहाय्यक आयुक्त मनीष वळुंज यांच्यासह महाराष्ट्रातील रजपूत समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
साडेचार टनांचा कांस्याचा पुतळा!
20 फूट उंचीच्या चौथऱयावर 16 फूट उंचीचा हा भव्य पुतळा स्थापित करण्यात आला आहे. साडेचार टन वजनी आणि कांस्याने बनवलेला हा पुतळा भालाधारी व अश्वारूढ आहे. पुतळा उभारताना संपूर्ण चौकाचे नावीन्यपूर्ण पद्धतीने सुशोभीकरणदेखील करण्यात आले आहे. या ठिकाणी चौकाला शोभेल अशी आकर्षक विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे. महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित विविध भित्तिशिल्पं आजूबाजूच्या त्रिकोणी बेटांवर लावण्यात आली आहेत. धुळय़ाचे शिल्पकार सरमद शरद पाटील यांनी 16 फूट उंचीचा पुतळा साकारला आहे.

























































