योगी सरकारला सतावते ‘अमावस की रात’; यूपी पोलिसांना हिंदू कॅलेंडर वापरण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
up-police

उत्तर प्रदेशच्या पोलीस प्रमुखांनी जारी केलेल्या परिपत्रकात पोलीस स्टेशन स्तरावरील अधिकाऱ्यांना हिंदू कॅलेंडरवरील तारखांच्या अनुसार गुन्ह्ये ट्रॅक करण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलीस प्रमुख विजय कुमार यांनी सांगितलं की, ‘राज्यभर करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या नोंदींनुसार अमावस्येच्या एक आठवडा आधी आणि त्यानंतरच्या आठवड्यात गुन्हेगारीचं प्रमाण अधिक असल्याचं दर्शवत आहे’.

पोलीस प्रमुखांच्या परिपत्रकात जिल्हा पोलीस शाखांना हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्येच्या रात्रीचा पंधरवडा म्हणजेच कृष्णपक्ष मार्क करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हा पोलीस दलांना सतर्कता वाढवण्यास आणि या पंधरवड्यातील रात्री नोंद झालेल्या गुन्ह्यांचा बारकाईनं मागोवा घेण्यास सांगितलं आहे. या इनपुट्सचा वापर गुन्हेगारीचे हॉटस्पॉट ओळखण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा अधिक चोख करण्यासाठी केला जावा, असं परिपत्रकात म्हटलं आहे. हॉटस्पॉट ओळखण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरापर्यंत हे कॅलेंडर पाळलं जावं असं राज्य पोलीस प्रमुखांनी सांगितलं आहे.

रात्रीच्या वेळी गुन्हेगारीप्रवृत्ती सक्रिय पाहायला मिळते आणि खून, चोरी, घरफोडी आणि महिलांवरील गुन्ह्यांचा जनमानसावर नकारात्मक परिणाम होतो, असं परिपत्रकात म्हटलं आहे. परिपत्रकात म्हटलं आहे की नागरिकांना सुरक्षित वाटण्यासाठी रात्रीच्यावेळी कडक पोलीस पाहारा महत्त्वाचा आहे.

पोलीस सूत्रांच्या मते, अमावस्येच्या रात्री गुन्ह्यांवर कडक नजर ठेवणे आणि गुन्ह्यांचा बारकाईने मागोवा घेणं ही एक जुनी प्रथा आहे. मात्र अधिकृत दस्तऐवजावर ‘हिंदू दिनदर्शिका’ असा शब्द टाकणं हे कदाचित पहिल्यांदाच घडल आहे.