वडिलांचं निधन, आई प्रियकरासोबत फरार; पोरक्या झालेल्या मुलाची पोलिसात धाव, म्हणाला, ‘ते मला…

उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे पतीच्या निधनानंतर दोन मुलांची आई प्रियकरासोबत फरार झाली. फरार होताना तिने घरातून साडे तीन लाख रुपये रोख आणि मौल्यवान दागिनेही लंपास केल्याचा आरोप आहे. वडिलांचे अकाली निधन आणि आई प्रियकरासोबत फरार झाल्याने पोरक्या झालेल्या अल्पवयीन मुलाने थेट पोलीस स्थानकात धाव घेत न्याय देण्याची मागणी केली.

मनीष वर्मा असे मुलाचे नाव आहे. मनीषच्या वडिलांचे काही काळापूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर मनीषच्या आईचे मुझफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या अनुज भाटी नावाच्या तरुणाशी सूत जुळले. काही दिवसांपूर्वी ती रिहाना, शहजादी आणि नूरजहा नावाच्या मैत्रिणींसोबत पंजाबला गेली आणि तिथून अनुज भाटीसोबत फरार झाली, अशी माहिती मनीषने पोलिसात दिली.

मनीषने असाही आरोप केला की, त्याच्या आईच्या मैत्रिणींनी त्याला धमकी दिली. एवढेच नाही तर मारहाण केली. आम्ही शेतकरी संघटनेशी संबंधित असून कुणी आमच्याविरुद्ध काहीही करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते, असा दावाही मनीषने केला.

आईने घरातील सर्व वस्तू विकल्या. आता आईचा प्रियकर वडिलांची जमीन आणि इतर मौल्यवान वस्तू हडप करायच्या तयारीत आहेत, असा आरोप मनीषने केला. तसेच घरामध्ये खायलाही काही नसून मी आणि माझा मोठा भाऊ पोरके झालो आहेत. आम्हाला धमक्याही येत असल्याचा आरोप मनीषने केला. पोलिसात तक्रार केली तर त्याला खोट्या खटल्यात अडकवू किंवा मारून टाकू, अशी धमकी आईच्या मैत्रिणींना दिल्याचा आरोपही त्याने केला.

Crime news – मुलगा शिकवणीला गेला, तो परतलाच नाही; प्रोफेसर वडिलांचा फोन खणाणला अन्…

पोलिसांना सर्व माहिती देऊनही काहीही कारवाई झाली नाही. हे प्रकरण गंगोह कोलवाली परिसरातील असून मनीषची आई 25 जुलैपासून बेपत्ता आहे. मनीषने आईसह तिच्या प्रियकरावर आणि मैत्रिणींवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.