
माजी केंद्रीय मंत्री आणि जनता दल युनायटेडच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी आज जेडीयूला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांना आज पटणा येथे पत्रकार परिषद घेत जेडीयूचा राजीनामा देतानाच राष्ट्रीय लोक जनता दल या आपल्या नव्या पक्षाची घेषणा केली आहे. कुशवाह यांचा हा निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
नितीश कुमार यांच्यासोबतची सुरूवात चांगली होती. मात्र शेवट योग्य नाही. ते ज्या मार्गाने जात आहेत, तो पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या पक्षाचा वारसदार ते दुसऱ्याच्या पक्षात शोधत आहेत, हे पूर्णपणे चूक असल्याचे उपेंद्र कुशवाह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. कुशवाह यांनी गेल्या अठरा वर्षात तिसऱ्यांदा जेडीयू सोडत आपल्या पक्षाची घोषणा केली आहे. याआधी 2005 आणि 2013 मध्ये त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.


























































