पठडीपेक्षा वेगळ्या भूमिका आवडतात!

946

अभिनेता म्हणजे उपेंद्र लिमये पहिल्यांदाच ‘तारा फ्रॉम सातारा’ या मालिकेद्वारे हिंदीच्या छोट्या पडद्यावर पदार्पण करतोय. यात तो नृत्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. प्रायोगिक रंगभूमीपासून मी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे वेगळ्या भूमिका आणि सशक्त कथानक निवडण्याकडे माझा जास्त कल असतो, असे उपेंद्र सांगतो.

  • पहिल्या हिंदी शोबद्दल काय सांगशील?

आजवर मी अनेक मालिका, सिनेमे केले आहेत, पण हिंदीतला हा माझा पहिलाच शो आहे. हिंदीत माझ्याकडे बऱ्यापैकी काम येत होते, पण कथानक न आवडणे किंवा विविध कारणांमुळे मी ते प्रेजेक्ट नाकारले. ‘तारा फ्रॉम सातारा’चे कथानक ऐकताक्षणीच मला आवडले. डेली शो असूनही सध्या टीव्हीवर झळकणाऱ्या इतर डेली शोपेक्षा हा शो खूप वेगळा आहे.

  • मालिकेच्या कथानकाबद्दल काय सांगशील?

यात मी कथ्थक प्रशिक्षकाची भूमिका साकारतोय. मालिकेत मला दोन मुली आहेत. मालिकेत मी डान्सिंग स्कूल चालवणारा असलो  बॉलीवूड डान्सची अजिबात आवड नाही अशी माझी भूमिका आहे. त्याची मोठी मुलगी त्याच्या शब्दाबाहेर नाही, पण लहान मुलगी तारा स्वच्छंदी आहे. अभ्यासात, क्लासिकल डान्समध्ये गती नाही. बाप आणि मुलीची सुंदर कथा यात पाहायला मिळेल.

  • नृत्य शिकण्यासाठी कुणाची मदत घेतलीस?

मी आशीष पाटील यांच्याकडून कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. मुळात मी सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस्चा माजी विद्यार्थी आहे. माझे कॉलेजमधील बरेच मित्र शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय वाद्य क्षेत्रात व्यावसायिक आहेत. नामांकित कथ्थक नृत्यांगना असलेल्या माझ्या पोलंडमधील एका मैत्रिणीने या कामात मला खूप मदत केली. तिने तिचे नृत्याचे खूप व्हिडीओ मला पाठकले.

  • सिनेमा किंवा मालिका स्वीकारताना काय निकष असतात ?

प्रायोगिक रंगभूमीपासून मी अभिनयाच्या प्रवासाला सुरुकात केली. त्यामुळे वेगळ्या भूमिका आणि सशक्त कथानक निवडण्याकडे माझा जास्त कल असतो. फक्त भूमिका दमदार असेल आणि कथानकात दम नसेल तर मी तो सिनेमा स्वीकारत नाही. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या जवळपास 12 सिनेमांशी मी जोडलो गेलो आहे. त्यामुळे मी निवडलेले सिनेमे योग्य होते असे मी म्हणेन.

आपली प्रतिक्रिया द्या