
उरण बायपास उड्डाणपुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुलाच्या बांधकामआड येणारी कांदळवन तोडण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी देतानाच पर्यावरण विभागाच्या सर्व अटींचे पालन करण्याच्या सूचना हायकोर्टाने सिडको प्रशासनाला दिल्या आहेत दरम्यान या उड्डाणपुलामुळे उरण ते पनवेल प्रवास सुसाट होणार आहे.
जेएनपीटी रोड, द्रोणागिरी येथे अवजड वाहनांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होती. याशिवाय येथे मोठया प्रमाणात प्रदूषणहीहोत असल्याने सिडकोने हॉटेल आनंदी ते द्रोणागिरी (उरण शहर) बायपास उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र उड्डाणपूल बांध कामाच्या आड कांदळवन येत असल्याने सिडकोने ही कांदळवन तोडण्यासाठी हायकोर्टात अॅड. आशुतोष कुलकर्णी यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी बाजू मांडत कोर्टाला सांगितले. नागरिकांच्या सोयीसाठी हा उड्डाणपूल होणे गरजेचे असून न्यायालयाने त्याला परवानगी द्यावी. हायकोर्टाने याची दखल घेत. 6266 चौ मी भागातील कांदळवन तोडण्यास परवानगी दिली तसेच ही परवानगी देतानाच पर्यावरण विभागाच्या सर्व अटींचे काटेकोर पालन करण्यास हायकोर्टाने सिडकोला बजावले.





























































