उरण महावितरणचा वीज चोरांवर कारवाईचा धडाका

157
electricity

उरण महावितरणने वीज चोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली असून मागील काही दिवसांमध्ये उरण तालुक्यात 120 वीज चोरांना महावितरणने कारवाईचा दणका दिला आहे. या वीज चोरांमध्ये अनेक नामवंत आणि राजकीय व्यक्ती असल्याने खळबळ माजली आहे. वीज गळती आणि वीज चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात भरारी पथकातर्फे धाडी टाकण्यात येत आहेत.

उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते. ही वीज चोरी रोखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ही कारवाई करण्यात येणार आहे. महावितरणने कारवाई केलेल्या 120 कारवायांमध्ये 2 लाख 78 हजार 2016 युनिट वीज चोरी उघड झाली आहे. याची एकूण किंमत 36 लाख 21 हजार 663 इतकी प्रचंड आहे. 120 वीज चोरांपैकी 97 ग्राहकांकडून वीज चोरी आणि दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर तब्बल 23 ग्राहकांनी वीज चोरीची आणि दंडाची रक्कम भरली नसल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती उरण महावितरण उपविभागाने दिली.

वीज चोरी करताना ग्राहकांनी अनेक क्लृप्त्या लढविल्याचे पुढे आले आहे. काही ग्राहकांनी वीज मीटरच्या सर्किटमध्ये फेरफार केला होता, काहीनी सर्व्हिस वायरला टॅपिंग केले होते, तर काहींनी मिटरमध्ये लुपिंग करून वीज वापरत होते. या प्रकारामुळे विजेचा वापर जास्त होत असला तरी मिटरची रिडींग कमी पडत असल्याने वीज गळती जास्त येत होती. उरण उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंढे यांनी वीज चोरी रोखण्यासाठी यापुढे जास्तीत जास्त आणि कठोर कारवाई करण्यात येणार आहेत असे सांगितले. वीज चोरी रोखण्यासाठी आणि थकित बिलांची रक्कम भरण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे अवाहन देखील त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या