उरणमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह

281

राजकुमार भगत। न्हावाशेवा

कोळी बांधव आणि मच्छिमारांचा पवित्र आणि आनंदाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमे निमित्त कोळी बांधव सागराला सोन्याचा नारळ अर्पण करून पुजा करतात आणि वर्षभर भरपुर मासळी मिळू दे आणि मच्छिमारांना सुरक्षित ठेव यासाठी प्रार्थना करतात. उरण तालुक्यात ठिकठिकाणी मिरवणूका काढून दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला. तालुक्यात करंजा, मोरा, दिघोडा या गावामध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला.

नारळी पौर्णिमे निमित्त प्रत्येक कोळीवाड्यात पारंपारिक कोळीगीते कमरेला रुमाल बांधलेली पुरुष मंडळी व नऊवारी साड्या नेसलेल्या, सोन्याच्या दागदागिन्यांनी मढलेल्या कोळी भगिनी सागराच्या पुजेला जाताना दिसतील. मूळात कोळी समाज हा अत्यंत उत्सवप्रिय. त्यात होळी आणि नारळीपौर्णिमा त्यांच्या विशेष प्रेमाचे सण असतात. माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने राज्य सरकारने 1 जून ते 31 जूलै हा मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर केला आहे. पुर्वी नारळी पौर्णिमेलाच सागराची पुजा करून मासेमारी सूरू व्हायची मात्र गेल्या काही वर्षात शासनाने याबाबत कालमर्यादा ठरवून दिली आहे. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी सागराची विधिवत पूजा केली जाते, नारळ अर्पण केला जातो. अनेक वर्षांपासूनची कोळीवाड्याची ही परंपरा आहे. काळ बदलला तरी कोळी बांधवांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.

‘कोळी बांधव नारळी पौर्णिमेला बोटींची पूजा करतात. बोटींना पताका लावतात. छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात आणि मासेमारीसाठी समुद्रात लोटतात. कोळीवाड्यातून मिरवणुका निघतात. थोरामोठ्यांपासून बच्चे कंपनीसह सगळे वाजत गाजत मिरवणुकीने बंदरावर येतात. पारंपरिक कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने या मिरवणुका निघतात. समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. सोन्याचा नारळ, म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टन लावून सजवलेला नारळ समुद्रात विधिवत सोडला जातो, ‘संपूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भर समुद्रात मासेमारीला निघतो. त्यावेळी कोळी महिलांची मदार सागरदेवावर असते. त्यामुळे कोळी महिलांच्या दृष्टीने या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळी पौर्णिमेन‌िमित्त खास बनवलेल्या नारळाच्या करंज्या (पूरण्या) यांचा नैवद्य बोटीला व समुद्राला दाखवतात. समुद्राची यशासांग पूजा करतात. खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी गावू दे… असे गाऱ्हाणे कोळी भगिनी समुद्राला घालतात.

आपली प्रतिक्रिया द्या