
सामना प्रतिनिधी । उरण
माजी आमदार विवेक पाटील यांचे मामे भाऊ तथा शेकापचे कोप्रोली विभाग चिटणीस सतिश म्हात्रे उर्फ ध्रुव म्हात्रे यांनी पक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळुन आपल्या अनेक समर्थकांसह शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. कोप्रोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीतच कोप्रोली गावातील शेकापक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कोप्रोली गावात आता शिवसेनेची ताकद वाढली आहे. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये कोप्रोली गावच्या माजी सरपंच अलका सतिश म्हात्रे,धनंजय म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ नेते ज.म .गावंड गुरूजी यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.
दरम्यान, या पक्ष प्रवेशावेळी शिवसेनेचे शिक्षक सेना रायगड जिल्हाध्यक्ष निर्भय म्हात्रे, शिवसेना उरण तालूका प्रमुख संतोष ठाकूर,कोप्रोली विभाग प्रमुख अनिल पाटील सह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कोप्रोली गावात आता शिवसेनेची ताकद वाढली असून या ग्रामपंचायतीवर जनहिताचे प्रश्र्न सोडविण्यासाठी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवू असा विश्वास आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केला.





























































