अतिशय निकृष्ट कामामुळे पहिल्या पावसातच सिंगापूर पोर्टचा रस्ता खचला

सामना प्रतिनिधी । उरण

जेएनपीटीचे बहुचर्चित बंदर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. या चौथ्या बंदरासाठी बांधण्यात आलेले रस्ते पहिल्या पावसातच खचल्यामुळे पुन्हा एकदा हे बंदर चर्चेत आले आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून या चौथ्या बंदरासाठी रस्ते बांधण्यात आले आहेत. मात्र पहिल्या पावसातच हे रस्ते खचल्यामुळे या कामाबाबत सांशकता व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हे बंदर सिंगापूर पोर्ट ऑथोरिटीने चालविण्यासाठी घेतले आहे. या बंदराचे काम खऱ्या अर्थाने पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसताना रस्त्यांची ही दुरवस्था पाहून कंपनीचे अधिकारीदेखील नाराज झाले असल्याचे बीएमसीटीएलच्या सूत्रांनी सांगितले.

जेएनपीटीचे चौथे बंदर अर्थात बीएमसीटीएल हे काही महिन्यांपूर्वी सुरू झाले. या बंदरासाठी मोठमोठे, ऐसपैस रस्ते बांधण्यात आले. न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोर अशा प्रकारचे अनेक मोठ मोठे रस्ते बांधले आहेत काहींचे काम सुरू आहे. मात्र पहिल्या पावसातच या मधील काही रस्ते खचले असून या रस्त्याला मोठमोठ्या भेगा गेलेल्या आहेत. जागतिक कीर्तीचे बंदर म्हणून शेखी मिरवत असलेल्या जेएनपीटी बंदरात या प्रकारचे रस्ते पाहून अनेक ग्राहक या बाबत नाके मुरडताना दिसत आहेत.

या बाबत जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता या रस्त्यांचे काम निकृष्ट असल्याचे त्यांनी मान्य केले. या बाबत एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना कळविले असून त्यांनी सोमवारी या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यांसाठी जेएनपीटी, सिडको आणि केंद्र सरकारने निधी दिला असून कामाचा ठेका देण्याचे काम व त्याच्यावर देखरेख ठेवण्याचे काम एनएचएआयच्या अधिकाऱ्यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर याबाबत एनएचएआयचे प्रकल्प अधिकारी प्रशांत फेगडे यांच्याकडे विचारणा करण्यासाठी फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या