
उरण तालुक्यातील गेली कित्येक वर्ष टंचाईग्रस्त गाव म्हणून ओळख असलेल्या करंजा गावातील कासवलेपाडा येथिल पाणी टंचाई दूर झाली आहे. येथील ग्रामस्थांनी 30 लाख वर्गणी गोळा करून स्वजलधारा योजना राबवली आणि वर्षानुवर्षाची पाणी टंचाई दुरू केली. या नळपाणी योजनेचे उदघाटन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी 07 डिसेंबर रोजी करण्यात आले.
उरण तालुक्यातील वर्षभर पाणी टंचाई असलेले करंजा गाव आहे. या गावाची पाणी टंचाई दुर करण्यासाठी अनेक उपाय योजना राबविण्यात आल्या मात्र तरी देखिल पाणी टंचाई दुर झाली नाही. हे गाव समुद्राच्या किनारी असल्यामुळे येथे गोड्या पाण्याचे स्त्रोत नाहीत त्यामुळे विहिरी आणि बोअरवेल नाहीत. त्यामुळे येथिल ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने लोकवर्गणी गोळा करून शासनाची स्वजल धारा योजनेतून सिडको कडून नवीन कनेक्शन मंजूर करून घेतले. यासाठी त्यांनी सिडकोची साडेचार लाख रूपये थकबाकीची रक्कम भरली आणि नवीन कनेक्शन मंजूर केले. सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा प्रकल्पातून या गावाला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी नळाचे पाणी सुरू करून या योजनेचे उद्घाटन केले. आत्ता या गावाला 24 तास मुबलक पाणी मिळणार आहे. या कार्यक्रमाला उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्या रिना घरत, माजी सरपंच जितेंद्र घरत, करंजा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन भालचंद्र कोळी, माजी चेअरमन प्रदिप नाखवा, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, नगरसेवक आणि शहराध्यक्ष कौशिक शहा आदी मान्यवर उपस्थित होते.




























































