
आईच्या दुधात युरेनियम आढळले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सदस्य आणि वरिष्ठ वैज्ञानिक यांनी म्हटले आहे की या अभ्यासातील निष्कर्षांमुळे कोणतीही सार्वजनिक आरोग्याची भीती नाही आणि बिहारमधील नमुन्यांमध्ये आढळलेले युरेनियमचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अनुमत मर्यादेपेक्षा खूप कमी आहे.
NDMA चे सदस्य आणि भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी संचालक, अणुवैज्ञानिक डॉ. दिनेश के. असवाल यांनी मुलाखतीत सांगितले की, या अभ्यासाचे निष्कर्ष चिंतेचे कारण नाहीत. “आढळलेल्या पातळ्या पूर्णपणे सुरक्षित मर्यादेत आहेत. प्रत्यक्षात, जागतिक आरोग्य संघटनेने पिण्याच्या पाण्यातील युरेनियमसाठी निश्चित केलेली मर्यादा बिहारमध्ये आढळलेल्या प्रमाणापेक्षा जवळजवळ सहापट जास्त आहे.”
पटना येथील महावीर कर्करोग संशोधन केंद्र, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि एम्स, नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञांनी बिहारमध्ये हा अभ्यास केला. ब्रिटिश जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्स मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अभ्यासात बिहारमधील स्तनदूधाच्या नमुन्यांत 5 ppb (पार्ट्स पर बिलियन) पर्यंत युरेनियम आढळले. अभ्यासाचे सह-लेखक आणि एम्स दिल्लीचे डॉ. अशोक शर्मा यांनी सांगितले की, “अभ्यासात 40 स्तनदा मातांच्या दूधाचे विश्लेषण करण्यात आले आणि सर्व नमुन्यांत युरेनियम (U-238) आढळले. जरी 70 टक्के बालकांमध्ये गैर-कर्करोग जोखीमची शक्यता दिसून आली, तरी एकूण युरेनियम पातळी अनुमत मर्यादेपेक्षा कमी आहे आणि मातां व बालकांवर प्रत्यक्ष आरोग्य परिणाम अत्यंत कमी असण्याची शक्यता आहे.”
डॉ. असवाल यांनी सांगितले की, “घाबरून होण्याचे अजिबात कारण नाही. मातांनी कोणतीही भीती न बाळगता स्तनपान सुरू ठेवावे.” जागतिक आरोग्य संघटनने पिण्याच्या पाण्यासाठी युरेनियमची सुरक्षित मर्यादा 30 ppb निश्चित केली आहे, जी बिहारच्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या प्रमाणापेक्षा सहापट जास्त आहे. जगभरातील मातीमध्ये नैसर्गिकरीत्या युरेनियमचे अतिशय सूक्ष्म प्रमाण आढळते. तसेच स्तनदा मातांकडून घेतलेले बहुतेक युरेनियम लघवीद्वारे बाहेर टाकले जाते आणि केवळ अत्यल्प प्रमाण स्तनदुधात प्रवेश करते.
























































