मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शिंदेंचे आस्ते कदम, 100 दिवसांच्या कार्यक्रमात पशुवैद्यकीय रुग्णालयाचा जीआर निघाला 240 दिवसांनी

राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या हद्दीतील मोकाट कुत्र्यांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक महापालिका क्षेत्रात एक सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षी 100 दिवसांच्या कृती आराखड्यांच्या कार्यक्रमात दिले. पण या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीचा जीआर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने तब्बल 240 दिवसांनी काढून गतिमान कारभाराची प्रचीती दिल्याची मंत्रालयात चर्चा आहे.

मोकाट कुत्र्यांच्या समस्येला आवर घालण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व महापालिकांच्या हद्दीत पाळीव व मोकाट प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याची योजना पुढे आली. त्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या कार्यक्रमातून झाली. सर्व सरकारी विभागाच्या कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना 100 दिवसांचा कृती आराखडा दिला. या कृती आराखड्याच्या संदर्भात राज्याच्या पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या सचिवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या सादरीकरणामध्ये शहरी भागातील पाळीव प्राण्यांची, मोकाट प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दाखवून दिले.

महापालिकेच्या हद्दीत एक रुग्णालय

सादरीकरणानंतर शहरी भागातील पाळीव, मोकाट प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्व महापालिकांच्या हद्दीत एक सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 27 जानेवारी 2025 रोजी दिले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील एका तरतुदीनुसार प्राण्यांसाठी रुग्णालये बांधणे किंवा चालवण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात पशुआरोग्य सेवा पुरवण्यासाठी रुग्णालये बांधणे किंवा चालवण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिकेची आहे.