लघवीचा रंग बदलतोय? ही आहेत कारणं….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या शरीरात होणारे बदल हे दाखवणारी अनेक लक्षणं आपल्या रोजच्या जगण्यात दिसत असतात. विशेषतः शरीर आपल्याला विविध मार्गांनी संकेत देत असतं. त्यातला एक प्रमुख मार्ग म्हणजे लघवी.

लघवीचा रंग तुमच्या शरीराविषयी आणि आरोग्याविषयी खूप काही सांगत असतो. तुमच्या शरीरातील बिघाड आणि बदल लघवीच्या रंगावाटे सांगता येऊ शकतात. फक्त ते ओळखता येणं गरजेचं आहे.

लघवीचा रंग सर्वसाधारणतः पिवळा असतो. लघवीत यूरोक्रोम नावाचं एक रसायन आढळतं. या रसायनाचा रंग पिवळा असतो. त्यामुळे लघवीलाही पिवळा रंग मिळतो. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, तेव्हा लघवीचा रंग गडद पिवळा किंवा हलका तपकिरी होतो. तेच जर लघवीचा रंग पाण्यासारखा दिसत असेल तर ते पाण्याची पातळी प्रमाणापेक्षा अधिक झाल्याचं लक्षण असतं. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स कमी होतात.

लघवीचा रंग क्वचित पाण्यासारखा दिसत असल्यास काळजीचं कारण नसतं. पण, सातत्याने दिसत असल्यास तुमच्या शरीरात प्रमाणापेक्षा जास्त पाणी जातं आणि ते प्रमाण कमी करण्याची गरज आहे, हे ओळखणं आवश्यक असतं. सतत पारदर्शक रंगाची लघवी होणं हे यूरिन सिरोसिस आणि व्हायरल हेपेटायटिस यांसारख्या यकृत विकारांचं लक्षण आहे.

लघवीचा रंग हलका पिवळसर ते गडद पिवळा असू शकतो. रक्तात ड जीवनसत्त्वाचं प्रमाण अधिक असल्यास लघवी नियॉन पिवळ्या रंगाची दिसू लागते. लघवीला लाल किंवा गुलाबी रंग येत असल्यास त्याची दोन कारणं असतात. कधी कधी बीटसारख्या रंगीत फळ-भाज्यांच्या सेवनाने लघवीचा रंग बदलतो. जर अशा कोणत्याही रंगीत फळांचं सेवन केलं नसेल आणि तरीही सातत्याने लाल किंवा गुलाबी रंगाची लघवी होत असेल तर प्रोस्टेट ग्रंथींची वाढ, मुतखडा, मूत्राशयातील ट्युमर अशा त्रासाचं लक्षण असू शकतं.

लघवीला नारिंगी रंग असल्यास ते शरीरातील पाण्याची पातळी खालावल्याचं लक्षण आहे. कावीळ झाल्यासही लघवी पिवळसर नारिंगी रंगाची होते. निळ्या किंवा हिरव्या रंगाची लघवी देखील शरीरात गेलेल्या त्या रंगाच्या पदार्थांमुळे होते. अनेक वेगवेगळ्या कँडीज आणि काही औषधांमध्ये मेथिलीन ब्ल्यू नावाच्या एका डायचा वापर केला जातो. त्याच्या सेवनाने लघवीचा रंग निळा होऊ शकतो. पण, असा कोणताही पदार्थ खाल्ला नसल्यास निळ्या रंगाची लघवी ही किडनी आणि ब्लॅडर संबंधित आजारांचं लक्षण असू शकतेय स्यूडोमोनास एरुगिनोसा नावाच्या एका जिवाणूजन्य संसर्गामुळे देखील लघवीचा रंग निळा, हिरवा किंवा जांभळा होऊ शकतो.