
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शारजील इमाम याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या उर्वशी चुडावाला यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर चुडावाला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चुडावाला यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात येणार आहे.
इमामच्या विरोधात राष्ट्रद्रोहासह अनेक गंभीर गुह्यांची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली असतानाच काही दिवसांपूर्वी त्याच्या समर्थनार्थ आझाद मैदान येथे एलजीबीटीक्यू (समलैंगिक-बायसेक्शुअल-ट्रान्सजेंडर-क्वीर) समाजघटकांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात चुडावाला (22) यांनी शार्जिलच्या समर्थनासाठी घोषणाबाजी केली, तर आंदोलनाआधी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टही लिहिली असा आरोप पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी आपल्याला अटक होऊ नये म्हणून चुडावाला हिने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी दिलासा देण्यास नकार देत तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर तिने आज हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांच्या खंडपीठासमोर मंगळवार, 11 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.


























































