बदला घेतला! अमेरिकेचा पाकिस्तान सीमेवर एअर स्ट्राइक; ‘इसिस’च्या कमांडरचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काबूल विमानतळाजवळ झालेल्या भीषण आत्मघाती स्फोटांचा बदला अमेरिकेने 48 तासांच्या आत घेतला आहे. पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या नांगहार प्रांतातील ‘इसिस’च्या अड्डय़ांवर जबरदस्त एअरस्ट्राइक करण्यात आला. यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून, हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या ‘इसिस’च्या कमांडरला यमसदनी धाडण्यात आले आहे.

असा केला एअरस्ट्राइक

इस्लामिक स्टेट-के अर्थात इसिसच्या खुरासन गटाच्या दहशतवाद्यांचे अड्डे नांगहार प्रांतात असून, तेथे काबूल हल्ल्यातील दहशतवादी असल्याची माहिती मिळताच ऑपरेशन सुरू केले.

या एअरस्ट्राइकमध्ये ज्या घरात दहशतवादी होते ते पूर्णपणे उद्धवस्त झाले. कार, ऑटो खाक झाले. जमिनीवर मोठा खड्डा पडल्याचे छायाचित्रांवरून दिसते.

या एअरस्ट्राइकमध्ये ‘इसिस’च्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यात काबूल विमानतळावरील हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या कमांडरलाही ठार केले आहे. एअर स्ट्राइक झाल्याचा पेंटागॉनने दुजोरा दिला आहे.

विमानतळाच्या गेटवर पुन्हा गोळीबार

काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावर शनिवारी पुन्हा गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. यावेळी गोंधळ उडाला. गोळीबार झाला तेव्हा हजारो नागरिक विमानतळ आणि परिसरात होते. अफरातफरी माजली. यावेळी अश्रुधुराच्या नळकांडय़ाही फोडण्यात आल्या. गोळीबार कोणी केला? हा दहशतवादी हल्ला होता का? हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे ‘रॉयटर्स’च्या वृत्तात म्हटले आहे.