हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार म्हणजे ७० टक्के लोकसंख्येवर मोठा प्रहार, राकेश टिकैत यांची केंद्र सरकारवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरून (Trade Deal) शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. हा करार म्हणजे हिंदुस्थानातील ७० टक्के लोकसंख्येवर झालेला सर्वात मोठा प्रहार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या करारामुळे हिंदुस्थानी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होईल, अशी भीती टिकैत यांनी व्यक्त केली.

X वर एक पोस्ट करत राकेश टिकैत म्हणाले की, “अमेरिकन शेतीला मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान मिळते, तर हिंदुस्थानातील शेतकरी आधीच खर्च, कर्ज आणि अनिश्चित बाजारपेठेशी झुंजत आहेत. आता जर स्वस्त अमेरिकन कृषी उत्पादने मोठ्या प्रमाणावर हिंदुस्तानात आयात झाल्यास हिंदुस्थानी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार नाही, परिणामी त्यांच्या उत्पन्नावर गदा येईल.”

राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले की, शेतकरी विकासाच्या विरोधात नाहीत, मात्र स्थानिक शेतकऱ्यांचा बळी देऊन केला जाणारा कोणताही आंतरराष्ट्रीय करार मान्य केला जाणार नाही.”