
इस्त्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. इस्त्रायलने बुधवारी पुन्हा एकदा इराणवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे. तेहरानच्या आकाशात इराणी लढाऊ विमान हवेतच पाडल्याचा दावा इस्त्रायली संरक्षण दलांनी केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत इस्त्रायली सुरक्षा दलाने हल्ल्याची माहिती दिली. आयएएफच्या एफ-35आय ‘अदिर’ लढाऊ विमानाने इराणी हवाई दलाचे YAK-130 लढाऊ विमान पाडल्याचे आयडीएफने पोस्टमध्ये म्हटले आहे.
F-35 या लढाऊ विमानाने ‘मॅन्ड’ (मानवचलित) फायटर विमानाला हवेत पाडल्याचा हा जागतिक विक्रम आहे. इस्त्रायलने तेहरानमधील इराणच्या सुरक्षा यंत्रणांच्या तळांवर आणि ‘बसिज’ (Basij) या निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर आतापर्यंत दहा हवाई हल्ले केले आहेत.
इस्त्रायली हवाई दलाने गेल्या 24 तासांत 700 हून अधिक मोहिमा (Sorties) पार पाडल्या असून इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणांना मोठ्या प्रमाणात निकामी केले आहे. तसेच इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाचा उत्तराधिकारी म्हणून जो कोणी पुढे येईल, त्यालाही लक्ष्य केले जाईल, असा इशारा इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इस्त्रायल काट्झ यांनी दिला आहे.
इस्रायल आणि इराणमधील संघर्षाचा जागतिक पातळीवरही परिणाम झाला असून, मुंबईतील सुमारे 450 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच, आखाती देशांमध्ये अडकलेल्या पर्यटकांना मायदेशी आणण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.

























































