भयंकर! दहा आठवड्याच्या चिमुकलीला 96 फ्रॅक्चर, आई वडिलांना अटक

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अमेरिेकेत दहा आठवड्याच्या चिमुकलीच्या हत्येप्रकरणी तिच्या आई वडिलांना अटक करण्यात आली आहे. मुलगी रडल्यावर वडील तिला मारहाण करत. यात गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात 12 दिवस उपचार घेतल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. पण घरी गेल्यावर नराधम वडिलांनी तिला पुन्हा अमानुषपणे मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. पोस्टमार्टेम अहवालात तिच्या शरीरावर 96 जागी फ्रॅक्चर असल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्या आई वडिलांना अटक करण्यात आली. जैजमिन असे या चिमुरडीचे नाव आहे.

जैजमिनला ह्यूस्टन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर बारा दिवसांनी तिला घरी सोडण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा जैजमिनला घेऊन तिचे आई वडील रुग्णालयात आले. ती हालचाल करत नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांनी तिच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यावेळी तिच्या शरीरात 96 फ्रॅक्चर असल्याचे आढळले. ते बघून डॉक्टरांना संशय आला व त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच जैजमिनला आपणच बेदम मारहाण केली व तिच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केल्याचे मान्य केले. तसेच आपले रागावर नियंत्रण नसल्याने जैजमिन जेव्हा रडायची तेव्हा आपण तिला मारहाण करायचो असेही त्याने मान्य केले. त्यानंतर जैजमिनच्या आईला व वडिलांना अटक करण्यात आली.