
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्ध मीच थांबवल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा केला. ‘व्यापारी करारांच्या मदतीने मी हिंदुस्थान-पाकमधील तणाव कमी केला. मी वेळीच पावले उचलली नसती तर दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध भडकले असते, असेही ते म्हणाले.
ट्रम्प पुढे म्हणाले, ‘देशा-देशांमधील युद्धे थांबवण्यात आम्ही यशस्वी झालोय. रवांडा आणि कांगोमध्ये गेल्या 30 वर्षांपासून संघर्ष सुरू होता. तो आम्ही थांबवला. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकमध्ये जे काही सुरू झाले होते, ते पाहता अवघ्या सात दिवसांत अणुयुद्ध झाले असते. खूपच वाईट स्थिती होती. आमच्याशी व्यापार करायचा असेल तर तुम्हाला हे थांबवावेच लागेल असे मी सांगितले आणि दोन्ही देशांनी ऐकले.’
हिंदुस्थानचे म्हणणे काय?
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान व पाकिस्तानमध्ये झालेले युद्ध अमेरिकेनेच थांबवले असे दावे ट्रम्प करत आहेत. मात्र, हिंदुस्थानने हे दावे फेटाळले आहेत. दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय चर्चेनंतर युद्धबंदी झाल्याचे हिंदुस्थानने म्हटले आहे.