जपानमध्ये होणार शिखर परिषद

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन

जपानमधील ओसाका येथे 28 आणि 29 जून रोजी जी-20 शिखर परिषद होणार असून त्यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. दोन्ही नेते दोन्ही देशांमधील व्यापारासहित आणखीही काही मुद्दय़ांवर चर्चा करतील. विशेष म्हणजे हिंदुस्थानात लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी आणि ट्रम्प प्रथमच भेटणार आहेत. भाजपप्रणीत आघाडीने केंद्रात दुसऱयांदा सत्ताग्रहण केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना टेलिफोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या.

या दोन नेत्यांच्या भेटीचे आयोजन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो करणार आहेत. ते बुधवारी हिंदुस्थान भेटीवर येणार असून तेव्हा ते परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार आहेत. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात आर्थिक मुद्दय़ांवरून सध्या मतभेद आहेत. असे असतानाही अमेरिकेला चांगल्या प्रकारे समजू शकेल असे सध्या तरी केवळ जयशंकर हेच आहेत असे म्हटले जाते. त्यामुळे माईक पोम्पियो हिंदुस्थानात आल्यावर जयशंकरच त्यांचा पाहुणचार करणार आहेत. तीन दिवसांच्या हिंदुस्थान भेटीवर पोम्पियो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. याबाबत बोलताना ट्रम्प प्रशासनातील एका अधिकाऱयाने सांगितले की, दोन्ही देश प्रगत व्हावेत, विकसित व्हावेत अशी ट्रम्प सरकारची इच्छा आहे.