
सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन
अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध भडकले असून आता अमेरिकेने 200 अरब डॉलर म्हणजेच सुमारे 13.84 लाख कोटी रुपये एवढय़ा आयातीवरील आयात कर 10 वरून 25 टक्क्यांवर नेला आहे. आयात करावरील चर्चेस चीनकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून आयात कर वाढवल्याची माहिती दिली.
चीनची उच्चस्तरीय समिती बुधवारी आयातीवर चर्चेसाठी अमेरिकेला रवाना होणार होती, पण ट्रम्प यांच्या ट्विटनंतर हा दौरा रद्द करण्यात आला. ट्रम्प यांनी सांगितले की, चीन 10 महिन्यांपासून 50 अरब डॉलरच्या आयातीवर 25 टक्के आणि 200 अरब डॉलरच्या आयातीवर 10 टक्के शुल्क देत आहे. चीनसोबत या विषयावर चर्चा अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. कारण चीन सौदेबाजी करीत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे.
























































