लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग असेल तर अमेरिकेचा व्हिसा मिळणे कठीण! ट्रम्प प्रशासनाचा आणखी एक मोठा निर्णय

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी व्हिसा बाबतचे नियम कठोर करण्यास सुरुवात केली. आधी त्यांनी एच 1 बी व्हिसा अर्ज शुक्लामध्ये वाढ केली होती. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग किंवा इतर गंभीर आजार असेल तर व्हिसा आणि ग्रीन कार्ड नाकारले जाऊ शकते. त्यामुळे अमेरिकेमध्ये स्थतांतरित होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या परदेशी नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

ट्रम्प प्रशासनाने व्हिसो धोरणामध्ये बदल केला असून यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेत स्थलांतरित होणे अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या अर्जदारांचा व्हिसा नाकारला जाऊ शकतो. याच संदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या दूतावास आणि वाणिज्य दूतावासांना व्हिसा घेणाऱ्यांच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या वैद्यकीय खर्चाचा भार सरकारवर पडू नये हा यामागील उद्देश असल्याचे दिसते.

परराष्ट्र विभागाने व्हिसा अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात अर्जदारांची, त्यांच्या मुलांची आणि वृद्ध पालकांची आरोग्य स्थितीही तपासण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वी आरोग्य तपासणी ही प्रामुख्याने संसर्गजन्य रोगांची केली जायची, मात्र आता मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार, श्वसनाचे रोग, कर्करोग, चयापचय आजार, न्यूरॉलॉजिकल आजार आणि मानसिक आजार यांचीही तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने स्थलांतरितांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनेक पावले उचलली आहे. यासाठी व्हिसा नियमही कठोर केले जात आहेत. आता आरोग्याशी संबंधित समस्या असेल तर व्हिसा अर्ज फेटाळण्याचीही तरतूद केली आहे. भविष्यात एखादी व्यक्ती अमेरिकेवर आर्थिक भार बनू नये यासाठी हे धोरण आखण्यात आले आहे. मात्र याचा फटका अमेरिकेमध्ये कायमचे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना बसणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी येणार हिंदुस्थानच्या भेटीला, मोदींनी रशियन तेल खरेदी घटविल्याचा केला दावा