बायडेन ‘इन ऍक्शन’,पहिल्याच दिवशी 17 आदेशांचा धडाका

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जो बायडन यांनी पहिल्याच दिवशी 17 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱया केल्या. या वेळी मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय रद्द करीत त्यांना दणका दिला. तसेच रोजगारासंबंधी ग्रीन कार्डसाठी प्रत्येक देशांना आखून दिलेली मर्यादाही संपुष्टात आणली. या निर्णयाने हिंदुस्थानी नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बायडन यांनी बुधवारी अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यानंतर पुढील काही तासांतच त्यांनी थेट राष्ट्राध्यक्ष कार्यालय (ओव्हल ऑफीस) गाठून कामकाजाला सुरुवात केली. मला काही काम करायचे आहे, म्हणूनच मी येथे आहे. मी वेळ वाया घालवू शकत नाही. लगेच कामाला सुरुवात करतोय. मी आधीच सांगितलेय की पुढील सात दिवसांत काही कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करेन, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसमोर देत बायडेन यांनी 17 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱया केल्या. ही सुरुवात आहे. येत्या काही दिवसांत ते आणखी निर्णय घेतील, असे बायडन यांचे प्रेस सचिव जेन साकी यांनी सांगितले.

हिंदुस्थानी नोकरदारांना असा होणार फायदा

ग्रीन कार्डसाठी प्रत्येक देशांना आखून दिलेली मर्यादा संपुष्टात आणण्याच्या निर्णयाचा अमेरिकेतील आयटी क्षेत्रात काम करणाऱया हजारो हिंदुस्थानी नोकरदारांना मोठा फायदा होणार आहे. सध्या प्रत्येक देशाला फक्त 7 टक्के ग्रीन कार्ड जारी करण्याची मर्यादा आहे. ही मर्यादा बायडन यांनी संपुष्टात आणली आहे. त्यामुळे हिंदुस्थानी नोकरदारांना आता अमेरिकेत कायदेशीर कायमस्वरुपी वास्तव्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.

बायडेन यांनी घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय

  • ट्रम्प यांनी मास्कची सक्ती केली नव्हती. मात्र बायडन यांनी सर्वात आधी मास्क सक्तीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. मास्कला ‘फेडरल प्रॉपर्टी’ म्हणून घोषित केले. सोशल डिस्टन्सिंगही बंधनकारक असेल.
  • इराक, इराण, लिबिया, सोमालिया, सुडान, सिरीया आणि यमन या मुस्लीम देशांवर लागू केलेली प्रवास बंदी हटवली.
  • अमेरिका पुन्हा जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य बनणार आहे. ट्रम्प यांनी मे 2020मध्ये डब्ल्यूएचओशी नाते तोडले होते.
  • पॅरिस करारामध्येही अमेरिका पुन्हा सहभागी होणार आहे. ट्रम्प यांनी 2019मध्ये या करारातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.
  • मेक्सिको बॉर्डरच्या फंडिंगवर बंदी लागू. तसेच पॅनडाबरोबरच्या वादग्रस्त किस्टोन एक्सएल पाईपलाईन करारावरही बंदी घातली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या