
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ला प्रोत्साहन देण्यासाठी स्वदेशी लेखकांची पुस्तके वापरा असे निर्देश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआ़यसीटीई) देशातील इंजिनीयरिंग महाविद्यालयांना दिले आहेत. त्या पुस्तकांची आणि प्रकाशकांची यादीही एआयसीटीईने बनवली आहे.
स्वदेशी लेखकांची पुस्तके ही दर्जेदार आणि स्वस्त आहेत. ती विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात किंबहुना आत्मनिर्भर भारत अभियानाचे लक्ष्यही त्यामुळे साध्य होऊ शकते असे एआयसीटीईचे मत आहे. हिंदुस्थानी लेखकांच्या पुस्तकांचा वापर इंजिनीयरिंग अभ्यासक्रमात झाल्यास त्यांची नावे जगाला समजू शकतील असेही एआयसीटीईचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी महाविद्यालयांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
























































