साय-फाय – सोशल मीडियाची ताकद

प्रसाद ताम्हणकर << [email protected] >>

जगात इंटरनेटचा वापर वाढत गेला तसा सोशल मीडियाचा वापरदेखील वाढत गेला. लोकांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी, निर्भीडपणे आपले विचार मांडण्यासाठी अनेक व्यासपीठे उपलब्ध होत गेली आणि नव्याने होत आहेत. या व्यासपीठांच्या माध्यमातून लोकांनी संघटितपणे अनेक उत्तमोत्तम उपाम राबवायला सुरुवात केली आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवायलादेखील सुरुवात केली. निर्भया प्रकरण असो किंवा कुस्तीपटू, शेतकऱ्यांचे आंदोलन असो, हिंदुस्थानने सोशल मीडियाची ताकद काय आहे हे या प्रकरणांमधून अनुभवले आहे. सोशल मीडियाच्या याच ताकदीने आता एका मोठय़ा रशियन रेल्वे कंपनीला गुढघ्यावर आणले आहे आणि जाहीर माफी मागायला लावली आहे.

आरजेएचडी (RJHD) ही रशियातली मातब्बर रेल्वे कंपनी. 11 जानेवारीला या कंपनीच्या एका रेल्वेचा नेहमीप्रमाणे प्रवास सुरू होता. अचानक ट्रेनच्या कंडक्टरला त्याच्या केबिनमध्ये एक राखाडी पांढऱ्या रंगाचे मांजर दिसले. भटके मांजर समजून या कंडक्टरने त्या मांजराला सरळ ट्रेनमधून बाहेर फेकून दिले. ही घटना किरोव्ह या प्रांतातून रेल्वे जात असताना घडली. सध्या रशियात थंडीची तीव्र लाट आलेली आहे. किरोव्हमध्ये ही घटना घडली तेव्हा तर तापमान शून्याच्या 30 अंश खाली इतके भयानक थंड होते. अर्थातच ट्रेनबाहेर फेकलेल्या या मांजरीचा थंडी सहन न झाल्याने मृत्यू झाला. मांजराला ट्रेन बाहेर फेकल्याचे कळताच शेकडो लोक स्वयंस्फूर्तीने त्याच्या शोधासाठी बाहेर पडले. मात्र त्यांना थंडीने आणि इतर प्राण्यांनी घेतलेल्या चाव्यांमुळे मृत झालेल्या ट्रिक्स नावाच्या या मांजराचा मृतदेह मिळाला.

मांजराला बाहेर फेकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि हजारो लोक एका चॅनेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर एकत्र आले. या लोकांनी कंपनीविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले. जवळपास दोन लाख स्थानिक लोकांनी या महिला कंडक्टरला बडतर्फ करण्याच्या मागणीच्या पत्रावर सही करून, ते पत्र स्थानिक प्रशासनाला सुपूर्द केले. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने लोकांमध्ये संतापाचा भडका उडाला. सध्या या महिला कंडक्टरची ओळख उघड करण्यात आलेली नसली तरी लोकांच्या तीव्र भावना आणि उद्वेग पाहून रेल्वे कंपनी मात्र चांगलीच हबकली आहे. सोशल मीडियाचा माध्यमातून या रेल्वे कंपनीने जाहीर माफी मागितली असून आपल्या कर्मचाऱ्यांनी प्राण्यांशी चांगले वर्तन ठेवायला हवे होते अशी कबुली दिली आहे. तसेच आता कंपनीच्या नियमात बदल करण्यात आले असून यापुढे अशी घटना घडणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

लोकांच्या या दबावाचा इतका परिणाम झाला की, रेल्वे कंपनीने आता आपल्या नियमात बदल करत कोणत्याही प्राण्याला चालत्या रेल्वेतून बाहेर काढण्यास सक्त मनाई केली आहे. असे प्राणी आढळल्यास त्यांना रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केले जाईल आणि त्यानंतर या प्राण्यांना प्राणीमित्र संघटनांच्या हवाली केले जाईल. कंपनीने आपल्या निवेदनात सांगितले की, कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांनीदेखील या मांजरीच्या शोधात सहभाग नोंदवला होता. तसेच कंपनीला आता उपरती झाली असून या रेल्वे कंपनीची एक उपकंपनी आता संपूर्ण रशियामध्ये भटक्या प्राण्यांचे संगोपन करणाऱ्या संस्थांसोबत कामदेखील करणार आहे.

हे सगळे प्रकरण चर्चेत आल्यानंतर मृत पावलेली मांजर ट्रिक्स ही भटकी नव्हती, तर आपल्या मालकाबरोबर प्रवास करत होती असे समोर आले आहे. प्रवासादरम्यान ती आपल्या ट्रव्हल किटमधून बाहेर पडली आणि रेल्वेत फिरायला लागली. अनेक लोकांनी तिला दोन सीटच्या रांगेमधून हिंडताना पाहिले होते. ट्रिक्सच्या मालकाने आता या प्रकरणात न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले आहे. माणूस भावनाशून्य होत चालला आहे असे वाटत असताना मुक्या जनावराला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र आलेला हा प्रचंड जनसमुदाय सध्या जगभराच्या सोशल मीडियामध्ये कौतुकाचा विषय बनलेला आहे. रशियाच्या बाहेरचे विविध देशांतील अनेक लोक ट्रिक्सच्या नावाने तयार करण्यात आलेल्या सोशल मीडियावरील चॅनेलमध्ये सहभागी होत आहेत आणि या प्रकरणाच्या ताज्या घडामोडींवर होत असलेल्या चर्चेत सहभागीदेखील होत आहेत.