परफेक्ट पाणीपुरीचे पाणी आता बनवा घरच्या घरी! या टिप्स वापरा बाजारातील पाणीपुरी होईल फेल

गोलगप्पा… हे नाव ऐकताच तुमच्या तोंडाला पाणी सुटले, बरोबर? हिंदुस्थानातील हे लोकप्रिय स्ट्रीट फूड डिश.. पाणीपुरी, बतासे, गोलगप्पा अशी कित्येक नावं आहेत. पाणीपुरी केवळ कुरकुरीतपणासाठीच नाही तर त्याच्या मसालेदार आणि तिखट पाण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. आपण बाजारात वेगवेगळ्या चवीचे पाणी चाखतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही घरी अगदी तेच, पण त्याहूनही चांगले पाणी बनवू शकता? घरात बनवण्यात येणारे हे पाणी स्वच्छ आणि शुद्ध तर असेलच, शिवाय बाजारातील पाण्यापेक्षा या पाण्याची चवही नक्कीच भारी असेल.

कमी खर्चात चटपटीत पाणीपुरी करा घरच्या घरी, आता बाहेर जाण्याची गरज नाही!

पुदिना आणि कोथिंबीर पाणी

पाणीपुरीच्या पाण्यातील हा सर्वात लोकप्रिय आणि सदाहरित आहे. त्याचा ताजेपणा आणि तिखटपणा पाणीपुरीची लज्जत वाढवतो.

साहित्य:

1 कप ताजी पुदिन्याची पाने
1/2 कप कोथिंबीर
2-3 हिरव्या मिरच्या
1 इंच आल्याचा तुकडा
1/2 टीस्पून भाजलेले जिरे पावडर
1/2 टीस्पून काळे मीठ
1/4 टीस्पून मीठ
1 टीस्पून आमचूर पावडर
1/2 टीस्पून चाट मसाला
लिंबाचा रस
2 कप थंड पाणी
आवश्यकतेनुसार बुंदी

कृती – पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि आले ब्लेंडरमध्ये घाला आणि थोडे पाणी घालून बारीक पेस्ट बनवा.

पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढा. आता भाजलेली जिरे पावडर, काळे मीठ, पांढरे मीठ, आमचूर पावडर, चाट मसाला आणि लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा. त्यात २ कप थंड पाणी घाला. ते गाळून न घेताच पाणी तसे ठेवा. शेवटी त्यात बुंदी घाला.

भाजलेला टोमॅटो-लसूण पाणी

पाणीपुरी खाताना थोडा वेगळा पाण्याचा फ्लेवर ट्राय करायचा असेल तर हे पाणी सर्वात बेस्ट. भाजलेले टोमॅटो आणि लसणाने या पाण्याला एक वेगळीच चव येते.

साहित्य:

2 मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो
7-8 लसूण पाकळ्या
7-8 हिरव्या मिरच्या
1/2 कप कोथिंबीर
1/2 चमचा भाजलेले जिरे पावडर
1/2 चमचा काळे मीठ
1/4 चमचा पांढरे मीठ
1/2 चमचा चाट मसाला
1 चमचा लिंबाचा रस
2 कप थंड पाणी
बुंदी आणि बारीक चिरलेला कांदा

कृती- टोमॅटो आणि लसूण पाकळ्या थेट गॅसच्या आचेवर किंवा पॅनवर थोडे तेल घालून त्यांची त्वचा थोडी काळी होईपर्यंत आणि मऊ होईपर्यंत भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर टाॅमेटो आणि लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करा. यामध्ये पाणी घालून, नंतर हवे असल्यास हे पाणी गाळून घ्या. पाणी तयार झाल्यानंतर त्यात मीठ, जिरेपूड, चाट मसाला घालावा. सर्वात शेवटी बुंदी घालावी.