उत्तनच्या चौपाटीचा ‘बॉब कट, वेलंकणी बीचवर साफसफाई होणार फास्ट

प्रसिद्ध उत्तन चौपाटीची साफसफाई करण्यासाठी महापालिकेने बंद असलेली ‘बॉब कट’ मशीन पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे वेलंकणी बीचवरील स्वच्छतादेखील फास्ट होणार असून संपूर्ण सागरीकिनारा चकाचक होईल. ‘बॉब कट’ मशीनमुळे श्रम, पैसे तसेच वेळेचीदेखील बचत होणार असून बीचचे रुपडे पालटणार आहे.

सामाजिक संस्थेच्या व लोकप्रतिनिधी यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मशीन शुक्रवारपासून नियमित सुरू केली. उत्तन चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून 2022-23 मध्ये बॉब कट सुरू करण्यात आली होती.

ही मशीन महापालिकेकडे चालवण्यासाठी देण्यात आली होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे एक वर्ष ती बंद राहिली. त्यामुळे चौपाटीवर जमा होणारा कचरा कर्मचाऱ्याद्वारे पूर्णपणे साफ होत नव्हता. याचा पर्यटक व स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. बीचवरील कचरा हटवण्यासाठी लागणारे प्रचंड श्रम आणि आव्हान लक्षात घेऊन मशीन त्वरित सुरू करण्याचे आदेश आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिले होते.

प्रभावी प्रक्रिया
शुक्रवारपासून ही बॉब कट मशीन पुन्हा सुरू करण्यात आली असून वेलंकणी बीचवरील स्वच्छता मोहिमेला नवी गती मिळणार आहे. बीचवरील कचरा हटवण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि जलद होईल. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे वेलंकणी बीच स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत होणार आहे.