
ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करणाऱ्या एका खेळाडूने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राहुल कुमार असे आत्महत्या करणाऱ्या 23 वर्षीय खेळाडूचे नाव असून तो उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील रायपूर येथील रहिवासी होती. झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोटही लिहिली असून यात त्याने आपल्याला बलात्काराच्या प्रकरणामध्ये अडकवण्यात आल्याचे म्हटले आहे.
राहुल कुमार याने कमी वयामध्ये आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. देश-विदेशामध्ये त्याने अनेक पदकं जिंकली होती. दिल्लीमध्ये राहून तो ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करत होता. याच दरम्यान दिल्लीत राहणाऱ्या एका तरुणीच्या कुटुंबियांनी राहुलवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. दिल्ली पोलिसांनी राहुलला अटक केली होती. जवळपास 19 महिने तो तुरुंगात होता. एक महिन्यापूर्वीच राहुल जामिनावर बाहेर आला होता. तेव्हापासून तो तणावामध्ये होता. याच तणावातून त्याने आत्महत्या केली.
मृत्युपूर्वी राहुल याने सुसाईड नोट लिहिली होती. यात त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. ‘माझ्यावर खोटो आरोप करून मला तुरुंगामध्ये बंद करण्यात आल्यापासून मी तणावामध्ये आहे. मी काहीही वाईट केले नाही. ती मुलगी फक्त माझी मैत्रीण होती. तिने मला काम देते म्हणून बोलावलो होते. तरीही तिच्या आई-वडिलांनी माझ्यावर फूस लावून पळवल्याचा आणि बलात्काराचा आरोप करून मला तुरुंगामध्ये बंद केले. 19 महिने तुरुंगामध्ये राहिल्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. मला आता सरकारी नोकरीही मिळणार नाही. तुरुंगात गेल्यामुळे मी तणावात असून त्यामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे’, असे राहुलने सुसाईड नोटमध्ये लिहिले.
मला माफ करा. यात माझ्या कुटुंबाचा दोष नाही. मी जे काही करतोय ते माझ्या मर्जीने करतोय. परंतु मुलीच्या आई-वडिलांना सोडू नका, त्यांची चौकशी करा. त्यांनी पैशांसाठी मला फसवले. बाबा, मला माफ करा. माझे स्वप्न बडा खेळाडू होण्याचे होते. मी मेहनत घेतली. देश-विदेशात पदकं जिंकली. परंतु माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी बलात्कार केला नाही. मुलीने माझ्यासोबत काहीही घडले नसल्याचे सांगितले. तरीही मला शिक्षा देण्यात आली. हा कलंक घेऊन मी जगू शकत नाही, असेही राहुलने सुसाईड नोटमध्ये लिहिले.
राहुलचे वडील मुकेश कुमार यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना तो तणावात होता असे सांगितले. मुलीचे आई-वडील पैशांसाठी त्याला ब्लॅकमेल करत होते. एक महिन्यांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. मुलीचे आई-वडील पैसे मागत होते. आम्ही 10 लाख आधीच त्यांना दिल्याचेही मुकेश कुमार यांनी सांगितले. या प्रकरणी खतौली पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.




























































