
उत्तर प्रदेशच्या आझमगढ येथे धर्मांतरणाचा प्रकार उघड झाला आहे. काही महिला गावातील महिलांचं धर्मांतरण करत असल्याचं उघड झालं आहे. चांगलं जीवन, पैसे, महागड्या वस्तू आणि आजारी महिलांना उपचारांचं आमीष दाखवून धर्मांतरण होत असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पाच महिलांना अटक करण्यात आली आहे.
आझमगढ जिल्ह्यातील पतई तालुक्यातल्या किशोरी गावात हा प्रकार उघड उघडपणे सुरू होता. काही महिलांचं धर्मांतरण सुरू असताना पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली गेली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा डाव उधळून लावला. यातील काही महिला तिथून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. तरीही जवळपास पाच जणींना अटक करण्यात यश आलं. कुसुम, संगीता निषाद, सोनवर्षा, आशा प्रसाद, लक्ष्मी अशी या महिलांची नावं आहेत. तसंच, एका महिलेचा शोध अद्याप सुरू आहे.
उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. कारण, हा भाग बांगलादेश, नेपाळ आणि बिहारच्या नजीक आहे. ख्रिश्चन मिशनरी बांग्लादेश आणि नेपाळहून बिहारमार्गे उत्तर प्रदेशमध्ये येतात आणि धर्मांतरण करवतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
























































