
एखाद्या ऍक्शन फिल्ममध्ये शोभावा असा प्रकार उत्तर प्रदेशातील चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्ट अर्थात मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात घडला. बसपा नेत्याची हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालय खचाखच भरलेले असताना गोळय़ा घालून ठार मारण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी सुनावणी सुरू होती. गोळीबार झाल्यानंतर न्यायालयात एकच खळबळ उडाली, धावपळ उडाली. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायमूर्ती योगेश कुमार यांना गोळी लागण्याची शक्यता होती, परंतु ते या घटनेतून बालबाल बचावले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. न्यायालयाच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून मोठय़ा संख्येने पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
25 ते 26 राऊंड फायरिंग
बिजनौर मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात आज मंगळवारी दुपारी सर्व काही सुरळीत सुरू होते. बसपा नेते अहसान अहमद आणि त्यांचा भाचा या दोघांची हत्या करणारा आरोपी शाहनवाज याच्यावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. अचानक न्यायालयात गोळीबार सुरू झाला. सुनावणीला हजर असलेले इतके तिकडे पळू लागले. शाहनवाज याच्यावर आरोपींनी 25 ते 26 राऊंड फायरिंग केली. या फायरिंगमध्ये शाहनवाजच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली.
बापाच्या हत्येचा सूड
अहसान यांचा मुलगा साहिल याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने शाहनवाजची हत्या केली अशी माहिती पोलीस अधीक्षक संजीव त्यागी यांनी दिली. या घटनेनंतर पोलिसांनी साहिल आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयातच बंद केले. सर्व दरवाजे बंद करून घेतले आणि न्यायालयाला चारही बाजूंनी घेराव घातला. दरम्यान, गोळीबारात एक हेड कॉन्स्टेबल जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
28 मे रोजी झाली होती बसपा नेत्याची हत्या
बिजनौरमध्ये 28 मे रोजी बसपा नेता हाजी अहसान आणि त्यांचा भाचा शाबाद यांची त्यांच्या कार्यालयातच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बाईकवरून आलेले तीन तरुण मिठाई घेऊन आले होते. परंतु मिठाईच्या डब्यात त्यांनी पिस्तूल लपवून आणले होते. कार्यालयात गेल्यानतंर त्यांनी हाजी अहसान कोण आहे असे विचारले आणि अहसान यांच्यावर गोळ्या झाडल्या. अहसान हे प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करत होते.


























































