
‘हर घर तिरंगा’ या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात घरोघरी तिरंगा फडकवला जात आहे. अशावेळी उत्तरप्रदेशातील कुशीनगरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एका तरुण त्याच्या घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकवताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओची माहिती मिळताच पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
कुशीनगर जिल्ह्यातील बेदुपर गावातील सलमान नावाच्या तरुणाने आपल्या घराच्या छतावर पाकिस्तानचा झेंडा लावला. घरावर हा झेंडा पाहताच स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. यावेळी लोकांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी तरुणाच्या घरावर लावलेला पाकिस्तानचा ध्वज पोलिसांनी खाली उतरवला आणि सलमानला ताब्यात घेतले.
आरोपी सलमानच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आम्ही त्याला पाकिस्तानचा झेंडा लावण्यास विरोध केला मात्र तो आमच्याशी सहमत नव्हता. यावरून घरातील सदस्यांशी त्याचे भांडणही झाले. मात्र तरीही तो छतावर चढला आणि पाकिस्तानचा झेंडा फडकवला. यानंतर गावकऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून स्थानिक पोलिसांना माहिती दिली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


























































