
आज ना उद्या मदतीचा हात आपल्यापर्यंत पोहोचेल या आशेवर पाच दिवस तपोवन बोगद्यातील घुसमट सोसणाऱया 11 मजुरांना अखेर सहाव्या दिवशी मृत्यूने गाठले. हे मजूर अन्नपाण्याशिवाय जिवंत होते. शवविच्छेदन अहवालातून ही हृदयद्रावक माहिती पुढे आली आहे. आठवडा उलटल्यानंतरही देवभूमी उत्तराखंडमध्ये मृत्यूचे तांडव थांबलेले नाही. जलप्रलयातील 149 मजुरांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.
चमोली जिह्यातील हिमकडा कोसळून भीषण जलप्रलय घडला. याठिकाणी लष्कराच्या नेतृत्वाखाली विविध यंत्रणांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत 58 मजुरांचे मृतदेह सापडले असून यापैकी 11 जणांचे मृतदेह तपोवन बोगद्यातून बाहेर काढण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार हे मजूर दुर्घटना घडल्यापासून पुढील पाच दिवस म्हणजेच शुक्रवारपर्यंत जिवंत होते. शेकडो टन वजनाची दरड बोगद्याच्या तोंडाशी असल्यामुळे रेस्क्यू टीम त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचली नाही. अखेर सहाव्या दिवशी त्यांना मृत्यूने गाठले. दुर्घटनेतील आणखी 149 मजूर बेपत्ता असून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनला गती देण्यात आली आहे. गरज पडल्यास गाळ व दरडी हटवण्यासाठी आणखी मशिनींची मदत घेतली जाणार आहे.
जलप्रलयाला अमेरिकेची रडार सिस्टम कारणीभूत?
अमेरिकेने 56 वर्षांपूर्वी हिमालयच्या उंच पर्वतरांगांच्या परिसरात पाठवलेली रडार सिस्टम उत्तराखंडच्या जलप्रलयाला कारणीभूत ठरली का, याची चौकशी करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. अमेरिकेच्या रडारमध्ये अणुऊर्जेवर चालणारे प्लुटोनियमचे कॅप्सूल होते. जलप्रलयाचे नेमके कारण शोधण्यासाठी स्वतंत्र विभागाचीच स्थापना केली जात आहे.

























































