उत्तराखंडमध्ये रेल्वे स्थानकावरील उर्दूची जागा घेणार संस्कृत भाषा

427

उत्तर प्रदेशपासून निमिर्ती झालेल्या उत्तराखंड राज्यामध्ये आता रेल्वे स्थानकांच्या नावात मोठा बदल होणार आहे. उत्तराखंडमधील प्रत्येक रेल्वेस्थानकाचे नाव इंग्रजी, हिंदी आणि उर्दूमध्ये लिहिण्यात आले आहे. मात्र, आता त्यात बदल करून उर्दूची जागा संस्कृत घेणार आहे. त्यामुळे या स्थानकांच्या नावातून उर्दू भाषा वगळण्यात येणार आहे. त्याऐवजी आता इंग्रजी, हिंदी आणि संस्कृतमध्ये स्थानकाचे नाव लिहिण्यात येणार आहे. उत्तराखंडची अधिकृत भाषा संस्कृत आहे. त्यामुळे या भाषेला आता स्थानकाच्या नावात स्थान देण्यात येणार आहे.

रेल्वेच्या नियमावलीनुसारच हा बदल करण्यात येणार आहे. या नियमावलीनुसार स्थानकाचे नाव इंग्रजी, हिंदी आणि राज्याच्या अधिकृत भाषेत असायला हवे. या नियमावलीनुसारच हा बदल होणार असल्याचे उत्तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितले. उत्तराखंडची अधिकृत भाषा संस्कृत आहे. त्यामुळे उर्दूऐवजी आता स्थानकात संस्कृत नावाचा समावेश करण्यात येणार आहे. उत्तराखंड हा उत्तर प्रदेशचा भाग होता. उत्तर प्रदेशची अधिकृत भाषा उर्दू असल्याने त्यावेळी उत्तराखंडमधील स्थानकाचे नाव इंग्रजी, हिंदी आणि उर्दूत लिहिण्यात आले होते. आजही उत्तराखंडमधील रेल्वे स्थानकात या तीन भाषांमध्येच नाव लिहिलेले आढळते.

उत्तराखंडमध्ये संस्कृत ही अधिकृत भाषा झाल्यानंतर 2010 मध्येच हे बदल होणे अपेक्षित होते. मात्र, हिंदी आणि संस्कृतची लिपी एकच म्हणजे देवनागरी असल्याने संस्कृतला स्थानकांच्या नावात स्थान दिल्याने फारसा बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, रेल्वेच्या नियमावलीनुसार आता हे बदल करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या