लोकशाहीसाठी निवडणूक लाइफलाइन, उत्तराखंड हायकोर्टाचे परखड मत

निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असतानाच उत्तराखंड उच्च न्यायालयाने परखड मत व्यक्त केले आहे. निवडणूक ही लोकशाहीची लाइफलाइन असून प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनेच घेतल्या पाहिजेत, अशा शब्दांत न्यायालयाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला सुनावले.

जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीतही गोलमाल होण्याची भीती आहे. तशा प्रकारचा कुठलाही घोळ न करता पारदर्शक पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी निर्देश द्या, अशी विनंती पुष्पा नेगी या महिलेने केली. त्या महिलेच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती रवींद्र मैथनी यांनी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित केले. कोणत्याही निवडणुका पारदर्शक पद्धतीनेच घेतल्या पाहिजेत. प्रत्येक मत महत्त्वाचे असून त्यात कुठलाही गैरप्रकार होता कामा नये, अशी सक्त ताकीद देताच सरकार आणि निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायतीची निवडणूक मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने घेणार असल्याची हमी दिली. त्यानंतर खंडपीठाने याचिका निकाली काढली.