डेहराडूनमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; तिघांचे मृतदेह सापडले, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. हिमाचल परिवहन मंडळाची प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीमध्ये कोसळली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस डेहराडून मार्गे हिमाचल प्रदेशमधील पावटा साहिब गुरुद्वारा येथे जात होती. बसमध्ये 35 ते 40 प्रवासी होते. मंगळवारी सकाळी डेहराडून जिल्ह्यातील कालसी भागात येणाऱ्या क्वानू-मीनस मार्गावरील डोंगराळ भागात या बसचा अपघात झाला आणि बस 60 फूट खोल दरीत कोसळली.

अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफचे जवान, पोलीस आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यंत तीन प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याचे कळते.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धानी यांनी डेहराडून बस अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधत जखमींना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले. यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. गंभीर जखमी प्रवाशांना एअरलिफ्ट करत रुग्णालयात दाखल केले आहे.