
उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या धराली येथे झालेली ढगफुटी आणि भूस्खलनामुळे डोंगरातून दगड, माती तसेच चिखलासह आलेल्या लोंढय़ामुळे अख्खे गाव वाहून गेले. या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा आता पाचवर गेला आहे. आज आणखी एक मृतदेह बचाव पथकांच्या हाती लागला. उत्तरकाशीत अद्याप मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना घडतच असून महाराष्ट्रातील तब्बल 34 पर्यटकांशी संपर्क होत नसल्याचे समोर आले आहे. यात पुण्यातील 19 आणि जळगावमधील 15 पर्यटकांचा समावेश आहे.
उत्तराकाशीत अडकून पडलेल्या पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या राज्य आपत्कालीन कार्य पेंद्राकडून सातत्याने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. उत्तराखंड सरकारच्या आपत्कालीन कार्य पेंद्राकडून वेळोवेळी माहिती घेतली जात असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, जळगाव, नांदेड या जिल्ह्यांतील पर्यटक उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेले होते. यापैकी 34 पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
जळगावच्या पाळधी येथील 15 भाविकांचा एक समूह उत्तराखंड येथे गेला आहे. त्यांचे नातलग त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुण्यातील पर्यटकांचे कुटुंबीय चिंतेत
पुणे जिह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसारी खुर्द येथील सुमारे 22 पर्यटक उत्तरकाशी येथे अडकून पडले असून या पर्यटकांचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. मात्र, मंचर येथील प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी उत्तराखंडमधील प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली. परंतु, त्यानंतर पुन्हा त्यांच्याशी संपर्क तुटल्याने त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहेत.
n सोलापुरातून उत्तराखंड येथे गेलेले चार तरुण सुरक्षित असल्याची माहिती आहे.हिमाचलच्या किन्नौरमध्ये ढगफुटी; कैलास यात्रा थांबवली.
उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी, भूस्खलनाने हाहाकार माजवल्यानंतर आज हिमाचलच्या किन्नौरमध्ये ढगफुटीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. पुरामुळे किन्नौर कैलास यात्रा थांबवण्यात आली असून 413 भाविकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशातील कैलास यात्रेचा मार्ग मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून तब्बल 617 रस्ते बंद करण्यात आले आहेत.
आतापर्यंत 190 जणांना वाचवले
आतापर्यंत 190 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर अद्याप 50 लोकांसह 11 जवान बेपत्ता असल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि लष्कराचे जवान बचावकार्यात गुंतले आहेत. सर्वत्र चिखल, दगडमातीचे साम्राज्य असून अनेक घरे, हॉटेल्स ढिगाऱयाखाली गाडली गेली आहेत.
हेल्पलाईन क्रमांक जारी
महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुटकेसाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधला जात असून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, राज्य आपत्कालीन पेंद्र, महाराष्ट्रः 9321587143/ 022-22027990 आणि उत्तराखंड ः 0135-2710334/821 हे हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.