
सामना ऑनलाईन । चमोली
उत्तराखंडमध्ये रविवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून रविवारी चमोली आणि अलमोरा जिल्ह्यात ढगफुटी झाली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने शनिवारी उत्तराखंड व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाबरोबरच गारपीटीची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे या भागातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र रविवारी सकाळी संथगतीने सुरू झालेल्या पावसाने दुपारी रौद्ररुप धारण केले. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळू लागल्याने नागरिकांची एकच धावपळ झाली. तर दुसरीकडे चमोली आणि अलमोरा जिल्ह्यात अचानक आकाशात काळे ढग जमू लागले. यावेळी झालेल्या ढगफुटीत अनेक घरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. तर अलमोरा येथे वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सोमवारी चमोली .येथे नाल्यात सापडला. दरम्यान , बचाव पथकाने येथे मदतकार्य सुरू केले असून या ढगफुटीत अजून कोणी बेपत्ता झाले आहे का याचा शोध घेण्यात येत आहे.

























































