उत्थित वक्षासन

सीए अभिजित कुळकर्णी, योगशिक्षक, भारतीय योग मंदिर,  << www.bymyoga.in >>

अर्धहलासनानंतर ओघानेच येणारे आसन म्हणजे उत्थित वक्षासन. अर्धहलासनात आपण आपले पाय वर उचलून ठेवतो, तर या आसनात आपण शरीराचा वरील भाग अर्थात छाती वर उचलून ठेवतो. हे आसन दिसायला साधेसोपे, करायला मात्र काही वेळा कठीण असे आहे.

आसनाचा विधी

सर्वप्रथम सरळ पाठीवर झोपावे. हात खाली सोडावेत आणि शरीराला चिकटवून ठेवावेत. हाताचे तळवे जमिनीला लावून ठेवावेत. इतके झाल्यानंतर सावकाशपणे आपल्या शरीराचा कमरेपासूनचा वरील भाग हा वर उचलावा. जमिनीपासून 60 अंशांपर्यंतच शरीर वर उचलावे. हात आपल्या पायांना समांतर असू द्यावेत. आपल्या शरीराचे सर्व संतुलन हे आपल्या पायावरती आणि नितंबावरती झाले पाहिजे. थोडा वेळ (साधारण एक मिनिट)  या स्थितीमध्ये स्थिर रहावे. शरीर स्थिर असले पाहिजे. त्याच वेळी आपले मनही स्थिर असले पाहिजे. मनाच्या स्थिरतेसाठी आपली दृष्टी आपल्या हातांच्या बोटांवरती ठेवावी. नंतर प्रथम हात सावकाशपणे खाली आणावेत. नंतर सावकाशपणे शरीर खाली जमिनीवर आणावे. काही क्षणांची विश्रांती घेऊन पुन्हा या आसनाची आणखी एक आवृत्ती करावी.

आसनाचे लाभ   

हे आसन केल्यामुळे छातीच्या स्नायूंना आणि मानेला उत्तम व्यायाम मिळतो. दम वाढतो. अर्थात स्टॅमिना सुधारतो. या आसनाच्या अभ्यासाने आपल्या पोटाच्या स्नायूंनाही चांगला व्यायाम मिळतो. पोटाचे स्नायू मजबूत होतात. पोटाचे आरोग्य सुधारते.

वक्ष म्हणजे छाती. उत्थित म्हणजे वर उचलून ठेवण्याची स्थिती. या आसनात आपण छाती (शरीराचा वरील भाग) जमिनीपासून वर उचलून ठेवतो म्हणून या आसनाला उत्थित वक्षासन म्हणतात.